साजवार्ता
Date: 14/11/2026
राजदंड पळवण्याचा प्रयत्न; एमआयएमच्या नगरसेवकाचे निलंबन
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) शहरातील बेकायदा प्लॉटिंग आणि कोट्यवधी रुपयांच्या जमिनींच्या कथित विक्रीवरून शुक्रवारी (दि.१३) पार पडलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा अक्षरशः रणसंग्राम ठरली. एमआयएमचे स्वीकृत सदस्य मोहम्मद असरार यांनी प्रशासन व महापौरांवर गंभीर आरोप केल्याने त्यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या एमआयएम नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला, तर भाजप नगरसेवकांनी त्याला कडाडून विरोध केला. दोन्ही बाजूंच्या जोरदार घोषणाबाजी व रेटारेटीमुळे तब्बल पाऊण तास सभागृहाचा वेळ वाया गेला. अखेर एमआयएमने सभेवर बहिष्कार टाकत सभागृहाबाहेर ठिय्या मांडला.
महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सुरुवातीला विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी जाधववाडी परिसरातील बालाजी मठाच्या व श्रीराम मंदिराच्या जागेचा (गट क्र. १२४, १२६) मुद्दा
उपस्थित केला. वर्ग-२ ची जमीन असतानाही तिथे रस्ते व स्ट्रीट लाईट उभी करून बेकायदा प्लॉटिंगची विक्री झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई सुरू केल्यानंतर एका फोनमुळे ती थांबवण्यात आल्याचा दावा करत, दीड महिना उलटूनही गुन्हे दाखल न झाल्याबद्दल त्यांनी तात्काळ गुन्हे नोंदवण्याची मागणी केली. नगरसेवक शिवाजी दांडगे यांनीही शहरातील अन्य भागांतील बेकायदा प्लॉटिंगवर कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी लावून धरली.
दरम्यान, स्वीकृत सदस्य मोहम्मद असरार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेचा विषय काढला. यावर आधीच लेखी उत्तरे दिली असून आयुक्तांकडे सुनावणी पूर्ण झाल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. मात्र, महापौर व प्रशासन जागा हडपणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत असरार आक्रमक झाले. वारंवार सूचना देऊनही शांत न झाल्याने महापौरांनी त्यांना एक दिवसासाठी निलंबित केले.
निलंबनानंतर नगरसेवक आक्रमक
निलंबनानंतर एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी 'दादागिरी नही चलेगी'च्या घोषणा देत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. याला भाजपने 'जय श्रीराम', 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी प्रत्युत्तर दिले. दोन्ही गटांत धक्काबुक्की व रेटारेटी झाली. निलंबित सदस्याला बाहेर काढण्याचे आदेश महापौरांनी सुरक्षा रक्षकांना दिले, मात्र एमआयएम नगरसेवकांनी असरार यांच्याभोवती कडे केल्याने रक्षकांना जाता आले नाही. पीठासीन अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापौरांनी दिला. त्यानंतर ओसामा कदीर मौलाना, काकासाहेब काकडे यांच्यासह एमआयएम सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला.
दादागिरी खपवून घेणार नाही
एमआयएमचे ३६ नगरसेवक असले तरी सभागृहात त्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी दिला. जनतेचे प्रश्न सोडून वेळ वाया घालवला जात असल्याची टीका करत त्यांनी नगरसेवक अपात्रता प्रकरणाची फाईल उघडण्याचा इशाराही दिला.
सभा संपल्यानंतरही घोषणाबाजी
काही वेळानंतर एमआयएम सदस्य पुन्हा सभागृहात आले. विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी मंत्री अतुल सावे यांचे नाव घेत, त्यांनी लक्ष घातले असते तर हा प्रकार घडला नसता, असे वक्तव्य केले. यावर भाजप नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. याच गोंधळात महापौरांनी सर्व विषयांना मंजुरी देत राष्ट्रगीत घेतले आणि सभा आटोपती घेतली. सभा संपल्यानंतरही दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












